“मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला संदेश: संभ्रम नकोच! ज्याला पाडायचं त्याला पाडा अन्…,
आंतरवली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आणि स्पष्ट विचाराने मतदान करण्याचे आवाहन केले. “समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे, पण संभ्रम नकोय,” असे स्पष्ट करत त्यांनी मतदात्यांना आपले हित साधणारा निर्णय घेण्याचे आवाहन केले. “ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा आणि ज्यांना निवडून आणायचे आहे त्यांना निवडून आणा, पण मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना सोडू नका,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, समाजाने मत देताना आरक्षण समर्थक उमेदवारांचा व्हिडीओ घ्यावा, लिहून न घेता प्रत्यक्ष समर्पण दाखविणाऱ्यांना मतदान करावे. “मी कोणत्याही पक्षाला समर्थन दिलेले नाही, समाजाने योग्य निर्णय घ्यावा. मराठा समाज सुज्ञ आहे आणि आपल्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे,” असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, कोणतेही सरकार आले तरी मराठ्यांना आरक्षणासाठी लढावेच लागेल. लाखो मराठा बांधवांवर झालेल्या केसेस, तरुणांचे बलिदान लक्षात घेत समाजाने आपली एकजूट दाखवून योग्य उमेदवारांना निवडून आणावे. “माझे मराठा समाज संकटात कधीच सोडणार नाही; आरक्षणासाठी पूर्णवेळ काम करण्यास मी तयार आहे,” असे सांगत जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना एकत्र येऊन मतदान करण्याचे आवाहन केले.