समर्थ पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील फौजदार आणि वॉर्डन लाच प्रकरणात रंगेहात पकडले

0

पुणे : नो पार्किंगमध्ये चारचाकी गाडी पार्क केल्याबद्दल जॅमर काढण्यासाठी एक हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी समर्थ वाहतूक विभागातील सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१) आणि ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८) या दोघांवर अँटी करप्शन विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, एका ३७ वर्षीय नागरिकाने त्यांची चारचाकी नो पार्किंगमध्ये उभी केली होती. यानंतर गाडीला जॅमर लावण्यात आले होते. हे जॅमर काढण्यासाठी आरोपी अनिस आगा याने एक हजार रुपये लाच मागितली. लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार सहमत झाल्यावर आरोपी रोटे यांनी आगा यांच्या वतीने लाच स्वीकारली आणि तडजोडीनंतर ७०० रुपये घेतले.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सखोल तपास करण्यात आला. तपासात रोटे आणि आगा यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. यानुसार, समर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अँटी करप्शन विभागाने केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारीसाठी संपर्क:
अँटी करप्शन ब्युरो: ०२० २६१२२१३४, २६१३२८०२
व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई: ९९ ३० ९९ ७७००
ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप: www.acbmaharashtra.net.in

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed