पुणे: “रेशन दुकानातून आचारसंहितेचे उल्लंघन”, काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
पुणे – विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या काळात रेशनिंग दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना दिवाळीच्या गोड शिधाच्या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो छापल्याने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली आहे.
काँग्रेसचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, उपाध्यक्ष अजित दरेकर आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप
काँग्रेसने या तक्रारीत रेशनिंग दुकानांतून शिधा वाटपाच्या पिशव्यांवर सरकारी नेत्यांचे फोटो छापून जाहिरातबाजी केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. शिष्टमंडळाने त्वरित या जाहिराती थांबवण्याची मागणी केली असून, या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तक्रारीनंतर पुढील कारवाईची मागणी
शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून होत असलेल्या या जाहिरातबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारे सरकारी योजनांच्या जाहिराती करण्याचे प्रकार थांबवले जावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे.