मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये तुफान गर्दी; बँक कर्मचारी १६ नोव्हेंबरला संपावर
मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यभरातील बँकांमध्ये तुफान गर्दी होत असून, यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या हिंसक घटनांमुळे सुरक्षेची मागणी करत महाराष्ट्रातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबर रोजी संपावर जाणार असल्याची माहिती बँक कर्मचारी संघटनेने दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमुळे बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी मारामारी आणि गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्यातील बँक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) संपाची हाक दिली आहे. UFBU ही नऊ बँक युनियनची संयुक्त संघटना आहे.
कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि गैरवर्तन
राज्याच्या विविध भागांमध्ये या योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ, मारहाण आणि गैरवर्तनाच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीमुळे बँकांमध्ये काम करणे धोकादायक ठरत आहे, असे बँक कर्मचारी सांगत आहेत.
संपाची मागणी आणि सुरक्षेचा आग्रह
योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने बँकांना पुरेशी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी UFBU चे राज्य संयोजक देविदास तुळजापूरकर यांनी केली आहे. सरकारकडून योग्य ती सुरक्षा व्यवस्था न मिळाल्यास बँक कर्मचार्यांचा संप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.