मेघगर्जनेसह विदर्भ-मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज; हवामान विभागाने दिला अलर्ट
मान्सून माघारी, तरीही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; काही भागांमध्ये यलो अलर्ट
पुणे: देशभरातून मान्सून माघारी परतत असताना, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर आणि जालना या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ऑक्टोबरच्या कडाक्याच्या उष्णतेने प्रभावित नागरिकांना आता काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. हवामान विभागाने काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २२ ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातून, २३ ऑक्टोबरला मराठवाड्यातून आणि २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी जाईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच ५ नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
यलो अलर्टचे जिल्हे
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
सावधगिरीचे आवाहन
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनपेक्षित पावसामुळे होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्याचे मार्गदर्शन दिले आहे.