Pune Traffic Restrictions: गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर 24/7 जड वाहन बंदी; वाहतूक पोलिसांनी जारी केले निर्बंध
Pune Traffic Restrictions: महाराष्ट्रामध्ये मुंबई-पुण्यासह अनेक शहरांत गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम सुरु झाली आहे. येत्या 7 सप्टेंबरला घरोघरी तसेच मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होतील.
पुण्यात गणेशोत्सवाच्या अगोदर, सार्वजनिक सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून अवजड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत. जड वाहनांमुळे होणारे संभाव्य धोके रोखणे आणि उत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे हे निर्बंधांचे उद्दिष्ट आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा), अमोल झेंडे यांनी जाहीर केले की, 5 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत, निर्दिष्ट रस्त्यावर 24 तास अवजड वाहनांना बंदी असेल. पुणे शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी होते.
त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून व रस्त्यांवरून धावणा-या जड / अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून, त्यांचे जिवीतास धोका होवू नये. तसेच पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालने इष्ट आहे, त्याअर्थी अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेशदेखावे वाहतूक करणारी वाहने इ.) खेरीज करुन खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.
दिनांक 5.9.2024 रोजी पासून ते 18.9.2024 म्हणजेच गणपती विसर्जना पर्यंत खालील नमुद रस्त्यांवर जड / अवजड वाहनांचे वाहतूकीस 24 तास बंदी करण्यात येत आहे. 1) शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक 2) टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक 3) कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक 4) लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक 5) केळकर रोड – फुटका बुरुज ते अलका चौक 6) बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा 7) शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक 8) कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक 9) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक 10) जंगली महाराज रोड स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक 11) सिंहगड रोड – राजाराम ब्रिज ते सावरकर चौक 12) मुदलियार रोड/ गणेश रोड- पॉवरहाऊस – दारुवाला – जिजामाता चौक – फुटका बुरुज चौक तरी वरील प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाडण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.