पुणे हिट अँड रन प्रकरणः ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी दोघांना केलं अटक
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर भागात मोठा अपघात झाला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडलं. या अपघातामध्ये अभियंता असलेल्या तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाला त्यावेळी ही अलिशान कार पुण्यातील एका बिल्डरचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. या अपघात प्रकरणात केवळ अपघातावर निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आल्यानं पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. दरम्यान त्यानंतर या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
आतापर्यंत या अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसोबत त्याच्या कारमध्ये असलेल्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. हे नमुने बदलल्याप्रकरणी आता आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर आजा न्यायालय निर्णय घेणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, यावर आज न्यायालय निर्णय घेणार आहे.