पुण्यात 20 हजार डॉक्टर संपावर, आरोग्यसेवा कोलमडली – Doctors strike in Pune
सर्व रुग्णालये 24 तास बंद : पुणे शहरातील सर्व रुग्णालये 24 तास बंद असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतंही रुग्णालय ओपीडी सुरू ठेवण्यात येणार नाही, असा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी घेतला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात इंडियन मेडिकल असोसिएशन तसंच विविध संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी केली. या संपात शहरातील 20 हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. तसंच पुण्यातील 900 रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळं आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होत आहे.
डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी : कोलकतामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आल्याचं आंदोलक डॉक्टरांनी यावेळी बोलताना सांगितलं. सर्व डॉक्टरांना सुरक्षा मिळावी, अशी आमची मागणी आहे. घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. तसंच रुग्णालयांची सुरक्षा झोन म्हणून नोंद करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केलीय.
रुग्णांची गैरसोय होणार नाही : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळं निवासी डॉक्टरांनी ‘काम बंद’चा इशारा दिला आहे. या घटनेमुळं शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलनात सहभागी व्हावे, असं आव्हान महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेनं (मार्ड) केलं होतं. निवासी डॉक्टरांचा संप सकाळी नऊ वाजता सुरू झालाय. निवासी डॉक्टर आपत्कालीन सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा आज देणार नाहीत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं देखील मार्डनं स्पष्ट केलंय.