पुणे शहर: वकिल एसीबीच्या जाळ्यात.! ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे: सदनिका आणि जागा खरेदीच्या प्रक्रियेत शासकीय शुल्कांव्यतिरिक्त दस्त नोंदणी अधिकारी यांच्या नावाने पैसे घेण्याचा प्रचलित प्रकार वाढला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची नोंद घेऊन खाजगी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकमाळ आळी, शिवाजी रस्त्यावर वकील माधव वसंत नाशिककर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, यामुळे कायदेशीर क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीने आपल्या पत्नीच्या नावावर सदनिका खरेदी केली होती आणि दुय्यम निबंधक कार्यालय-१ हवेली येथे दस्त नोंदणी केली होती. दस्त नोंदणीसाठी आवश्यक असलेले शासकीय शुल्क (स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, कागदपत्र हाताळणी शुल्क) ऑनलाईन भरले गेले होते. यासोबतच वकिलासाठीही फी देण्यात आली होती. परंतु, वकील माधव वसंत नाशिककर यांनी दस्त नोंदणी अधिकारी यांच्या नावाने ५ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली.
फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर, १३ ऑगस्ट रोजी खडकमाळ आळी, शिवाजी रस्त्यावर वनराज रसवंती गृहाच्या शेजारी तडजोडीअंती ३ हजार रुपये स्वीकारताना वकीलाला ताब्यात घेण्यात आले. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.