८० वर्षांच्या आईवर मुलाकडून जीवघेणा वार; पुण्यातील धक्कादायक घटना; 65 वर्षीय मुलाला अटक

पुणे : संपत्तीच्या वादातून मुलाने 80 वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवार पेठेतील मेहुणपुरा भागात शनिवारी (दि.6) रात्री घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 65 वर्षीय मुलाला अटक केली असून, गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अविनाश पांडुरंग साप्ते (वय 65, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, कुसुम साप्ते (वय 80) या जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फिर्याद अविनाश यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय 45) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश साप्ते, त्यांची आई कुसुम आणि फिर्यादी आशिष हे सर्व एका सोसायटीत एकत्र राहतात. घरातील संपत्तीच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. शनिवारी रात्री अविनाश दारूच्या नशेत घरी आला. त्याने आईशी वाद घालत चेहरा व डोक्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या कुसुम साप्ते यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आजीला वाचविण्यासाठी आशिष समेळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, अविनाश यांनी त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कारके करत आहेत.
—