संविधानाला ७५ वर्षे पूर्ण; समतादूतांच्या माध्यमातून राज्यभर ‘संविधान जागर’ कार्यक्रम उत्साहात
पुणे : भारतीय संविधानाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर ‘संविधान जागर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाटीॅच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये समतादूतांनी महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांसाठी संविधानपर कार्यक्रमांचे आयोजन केले.
महासंचालक मा. सुनील वारे, निबंधक मा. विशाल लोंढे, विभागप्रमुख मा. बबन जोगदंड यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती शितल बंडगर यांच्या नियोजनाखाली हा सप्ताह यशस्वीपणे पार पडला. समतादूत प्रशांत कुलकर्णी व श्रीमती संगीता शहाडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे संविधान जागर कार्यक्रमांना सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.



सप्ताहभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात संविधानाचे महत्त्व, मूलभूत कर्तव्ये, हक्क आणि नागरिकांची जबाबदारी यावरील व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा तसेच रॅलीचा समावेश होता.
याशिवाय ‘हर घर संविधान’ उपक्रमांतर्गत समतादूतांनी घराघरात जाऊन नागरिकांना संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यास प्रवृत्त केले तसेच एक चमचा साखर देऊन तोंड गोड करत संविधानाबद्दल जनजागृती केली.
संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, भारतीय संविधान चिरकाल टिकून राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कटिबद्ध राहावे, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.