पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १७ कोटींची मदत; दुर्धर आजारांवरील उपचारासाठी गरजूंना दिलासा; ४४५ रुग्णालये योजना संलग्न

पुणे : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्याच्या लढाईत हक्काची साथ देणारा मुख्यमंत्री साहाय्यता निधी गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे. यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना तब्बल १७ कोटी २८ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यातील ४४५ रुग्णालये मुख्यमंत्री साहाय्यता निधी योजनेसाठी संलग्नित आहेत. या निधीद्वारे हृदयविकार, कर्करोग, यकृत व मूत्रपिंडविकार, नवजात बालकांवरील आजार, अपघातग्रस्त रुग्ण, जळीत व विद्युत जळीत रुग्ण अशा ठरावीक गंभीर आजारांवर उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. रुग्णाच्या आजाराच्या स्वरूपानुसार २५ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार दिली जाते.
नुकत्याच स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना जिल्ह्यातील स्तरावरच मदतीसाठी अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे नागरीकांना मुंबईपर्यंत जावे लागणार नाही.
सहाय्य मिळवण्यासाठी https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच, cmrfpune@gmail.com या ई-मेलवर किंवा प्रत्यक्ष कक्षात भेट देऊनही अर्ज सादर करता येतो. ई-मेलद्वारे अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची PDF प्रत aao.cmrf-mh@gov.in या ई-मेलवर पाठवावी लागते. अर्ज प्रक्रिया नि:शुल्क असून नागरिकांनी कोणत्याही एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन कक्षाचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, योजनेअंतर्गत राज्याबाहेर उपचार घेणाऱ्या किंवा उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना मदत मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करण्यापूर्वी या अटी तपासून घ्याव्यात.
मदतीस पात्र आजारांची यादी :
हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थिमज्जा, गुडघा/हात/खुबा प्रत्यारोपण, कॉकलीअर इम्प्लाँट, कर्करोग, नवजात व बालरोग, अपघात, मेंदू विकार, डायलिसीस, जळीत व विद्युत अपघात इत्यादी.
—