१० हजार अर्जांची विक्री, पण उमेदवार मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतके!
पुणे : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचा आव आणला जात असला, तरी प्रत्यक्षात उमेदवारांची तयारी पाहता चित्र वेगळेच दिसत आहे. अवघ्या पाच दिवसांत तब्बल १० हजार ३०७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असताना, प्रशासनाकडे मात्र फक्त ३८ अर्ज दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याची कुजबुज सुरू आहे.
शनिवारी एकाच दिवशी १२०६ अर्जांची विक्री झाली, म्हणजे अर्ज घ्यायला गर्दी… पण भरायला मात्र उमेदवारांची पाठ फिरलेली! “अर्ज घ्या, पाहू पुढे काय होते” या भूमिकेत अनेक इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांत अर्ज विक्री व स्वीकृतीची सोय करण्यात आली असून, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तरीही अर्ज दाखल करण्याच्या बाबतीत इच्छुकांची पावले संथच आहेत.
नगररोड–वडगावशेरी कार्यालयातून सर्वाधिक १३१ अर्जांची विक्री, तर कोथरूड–बावधन आणि औंध–बाणेर कार्यालयांतून केवळ ४५ अर्जांची विक्री झाली. म्हणजे काही भागांत उत्साह ओसंडून वाहतोय, तर काही ठिकाणी निवडणूक आहे की नाही, याचाच प्रश्न!
एकीकडे हजारोंच्या संख्येने अर्जांची विक्री होत असताना, दुसरीकडे अवघ्या ३८ उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्याने, ही निवडणूक आहे की फक्त ‘अर्ज विक्री महोत्सव’, असा टोमणा राजकीय वर्तुळातून मारला जात आहे.
आता शेवटच्या दिवसांत उमेदवारांची गर्दी वाढते की अर्ज केवळ कपाटातच पडून राहतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.