पुणे: कोंढव्यात कोट्यवधींचा काळा धंदा उघड, गुन्हे शाखेचे डोळे होते झाकलेले?
बेकायदेशीर दारू विक्रीतून १ कोटी ८५ लाखांची रोकड सापडते, मग आधी कुणाला माहिती नव्हतीच कशी?

0
whatsapp-image-2025-12-25-at-111332-pm_1766684833.webp

पुणे : कोंढवा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीचा धंदा इतक्या निर्लज्जपणे सुरू होता की थेट घराच्या कपाटात १ कोटी ८५ लाखांहून अधिक रोख रक्कम साठवली गेली, आणि तरीही गुन्हे शाखेला याची खबर नव्हती, हेच नागरिकांच्या पचनी पडत नाही.

पहा व्हिडिओ

कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काकडे वस्ती, गल्ली नंबर २ येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण व डीबी पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईत बेकायदेशीर दारूसाठ्यासह आधी काही लाख, नंतर थेट कोट्यवधींची रोकड जप्त झाली.
देशी–विदेशी दारूचे फुगे, व्हिस्कीच्या बाटल्या, शेकडो नगांचा साठा आणि लाखोंची रोकड — हे सगळं काही एका गल्लीतील घरात साठवलेलं असताना गुन्हे शाखा, स्थानिक गस्त, गुप्त बातमीदार कुठे होते? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

प्राथमिक कारवाईत सुमारे सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल सापडल्यावर पोलिसांनी झडतीचा फास आवळला आणि मग बेडरूममधील कपाटांतून १ कोटी ८५ लाख ९५० रुपये बाहेर आले. एवढी मोठी रक्कम म्हणजे केवळ किरकोळ धंदा नसून सुसंघटित काळा व्यवहार असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रकरणात अमर कौर उर्फ मद्रीकौर जुनी, दिलदार सिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला, तरी हा धंदा एकट्याने चालतो का?
दररोज दारूची आवक–जावक, रोख व्यवहार, ग्राहकांची वर्दळ असूनही वर्षानुवर्षे कोणालाच संशय कसा आला नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “छोट्या चहाच्या टपरीवर नियमभंग झाला तरी कारवाई होते; पण इथे कोट्यवधींचा खेळ सुरू असताना यंत्रणा झोपली होती का?”
गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवर आणि माहिती संकलन यंत्रणेवरही त्यामुळे टीकेची झोड उठली आहे.

आता पोलिस तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी या काळ्या पैशामागे आणखी कोण आहेत, कोणाची ‘कृपादृष्टी’ होती का, याचा उलगडा होणार की प्रकरण थंड होणार, याकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed