पुणे: कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘कायम’ नोकरीचे आमिष; महापालिकेचा इशारा – “फसवणुकीपासून सावध रहा”

0
PMC-1.webp

पुणे प्रतिनिधी |
पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने याबाबत स्पष्ट भूमिका घेत कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या सेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने अधिकृत परिपत्रकातून दिले आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, “ठेकेदारांमार्फत नियुक्त केलेले सफाई कर्मचारी हे केवळ मर्यादित कालावधीसाठी नियुक्त केले जातात. त्यांना कायम करण्याची कोणतीही योजना अथवा प्रस्ताव सध्या अस्तित्वात नाही.”

महापालिकेच्या विविध प्रभागांत ठेकेदारांमार्फत राबविण्यात येणाऱ्या रस्ते सफाईसारख्या कामांमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना “तुम्हाला कायम केले जाईल” असे सांगून काही जणांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी चौकशीचे आदेश दिले होते. सविस्तर अहवाल त्यानंतर सादर करण्यात आला आहे.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करावे?
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यक्तीकडून “कायम नोकरी” मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ घनकचरा विभाग अथवा महापालिकेच्या अधिकृत कार्यालयात संपर्क साधावा.

महापालिकेच्या नावाने खोटे आश्वासन देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

महत्त्वाचे :

सध्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास तत्काळ तक्रार करा.

फसवणुकीपासून बचावासाठी सजग राहा.


“महापालिकेत कायम करण्याचे आमिष दाखवून कुणीही पैसे मागत असेल, तर तातडीने माहिती द्या. अशा प्रकारांमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक होते. कोणालाही बळी पडू नका.”
– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

Spread the love

Leave a Reply

You may have missed