येरवडा: राजीव गांधी रुग्णालयातील डॉक्टरांची वेळेपूर्वी गैरहजेरी; आरोग्य विभागाकडून चौकशीचे आदेश – व्हिडिओ

पुणे, येरवडा – प्रभाग क्रमांक ६ येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्टर वेळेपूर्वीच अनुपस्थित राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाची नियमित पाहणी करत असताना सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सुरू असलेल्या OPDमध्ये संबंधित डॉक्टर १२:३० वाजता रुग्णालयातून निघून गेले असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, लहान मुलांचे हाडांचे डॉक्टर तसेच त्वचारोगतज्ज्ञ (स्किन स्पेशालिस्ट) या दोघांसह एकूण तिघे डॉक्टर नियोजित वेळेपूर्वीच आपल्या कामावरून गेले होते. यामुळे उपस्थित रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
पहा व्हिडिओ
या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. आंधळे यांना तातडीने सूचित करण्यात आले. त्यांनी तत्काळ कारवाई करत रुग्णालयाचे इन्चार्ज डॉ. बागडे यांना चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. आंधळे यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, “OPD वेळा पाळणं ही डॉक्टरांची प्राथमिक जबाबदारी आहे. यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.”
या प्रकारामुळे रुग्ण सेवा व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, रुग्णांच्या हितासाठी रुग्णालय प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.