बांधकाम कामगारांचा आक्रोश: नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी; दिवाळी बोनसची घोषणा फसवी; कामगारांच्या हाती रिकामे हात
नागपूर, १८ डिसेंबर: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेमधील अडथळे दूर करून अर्ज तत्काळ निकाली काढावेत, अशी मागणी करत आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठा मोर्चा काढण्यात आला.
कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडसह विविध ठिकाणांहून हजारो कामगार या आंदोलनात सहभागी झाले. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती व कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने आयोजित या आंदोलनामध्ये राज्यभरातील बांधकाम कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला.
नोंदणी प्रक्रियेमध्ये अडथळ्यांचा आरोप
राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असून शासन व महामंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
“कामगारांसाठी जाहिराती खूप होत आहेत, मात्र प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. दिवाळी बोनस घोषित केला तरी कामगारांच्या हाती काहीही आलेले नाही. विविध योजनाही थंडावल्या आहेत,” असे काशिनाथ नखाते यांनी स्पष्ट केले.
अपघाती मृत्यूला कोण जबाबदार?
नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया ठप्प असल्याने अनेक कामगार अपघातांमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. या काळात झालेल्या अपघातांसाठी शासन व महामंडळ जबाबदार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी
तालुकास्तरावर नोंदणी केंद्रे निर्माण करण्यात आली असली, तरी ती अपुरी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “प्रत्येक जिल्ह्यातील कामगारांची संख्या लक्षात घेता, नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे अत्यावश्यक आहे,” असे नखाते म्हणाले.
मोर्चा समन्वय समिती सक्रिय
या आंदोलनासाठी समन्वय समितीमध्ये राजेश माने (उपाध्यक्ष), लाला राठोड (संघटक), निरंजन लोखंडे, महादेव गायकवाड, किरण साडेकर, सलीम डांगे आणि विनोद गवई यांचा समावेश होता.
कामगारांच्या मागण्या आणि संताप हिवाळी अधिवेशनात गाजणार हे निश्चित असून, शासन या प्रलंबित प्रश्नांकडे कसे लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.