पिंपरीमध्ये लाचकांडाचा पर्दाफाश : महिला वाहतूक पोलिस व वॉर्डन ४०० रुपयांच्या लाचेवर रंगेहात
पिंपरी : पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांच्या लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षाचालकाकडून केवळ ४०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई वर्षा विठ्ठल कांबळे (३५) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (२८) यांचा समावेश आहे. दोघांवर रिक्षाचालकाकडून विविध कारणांखाली लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच मागणीची मालिका सुरूच…
तक्रारदार हा पिंपरी, मोरवाडी आणि केएसबी चौक परिसरात रिक्षा चालवतो. १७ नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याचा मुद्दा काढून वर्षा कांबळे आणि गव्हाणे यांनी त्याच्याकडून ३०० रुपये घेतले. मात्र, २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा ‘दरमहा हप्ता’ म्हणून ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर त्रस्त रिक्षाचालकाने एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
एसीबीचा सापळा आणि रंगेहात पकड
तक्रारीची प्राथमिक पडताळणी करताना दोघांनीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने पिंपरीतील केएसबी चौकात शनिवारी सापळा रचला. ट्रॅप दरम्यान ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदाराकडून ४०० रुपये स्वीकारताच पथकाने त्याला जागीच जेरबंद केले. त्यानंतर पुढील चौकशीत वर्षा कांबळे हिलाही ताब्यात घेण्यात आले.
गुन्हा दाखल; नागरिकांमध्ये संताप
या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास संत तुकारामनगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. एसीबीच्या कारवाईमुळे वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला गती मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.