शासनाच्या योजना झाल्या उदंड, पण सर्व्हर मात्र थंड; पुण्यामधील जनतेमधून नाराजीचा सूर
पुणे: केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. इतक्या योजना आहेत की, त्यांची संख्या खूपच जास्त आहे. सर्व योजनांचे फॉर्म ऑनलाइन भरावे लागतात. मात्र, सर्व्हरच्या अभावी, या योजना थंडावल्या आहेत. त्यामुळे पुणे शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सध्या, जन्म, मृत्यूचे दाखले ते शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म ऑनलाइन भरले जात आहेत. पुणे शहर आणि तालुक्यातील सीएससी सेंटर, महा-ई-सेवा, तसेच मोबाईल ऍप्सद्वारे अनेक योजनांचे अर्ज शासनाकडे पाठवले जात आहेत. सामान्य नागरिकांसाठी ही एक उत्तम सुविधा आहे. विविध कार्यालयात जाण्याऐवजी, ऑनलाइन अर्ज भरल्याने अनेकांचा वेळ वाचतो आणि अर्जांना मंजुरी मिळते. शेतीच्या योजना, शालेय शिष्यवृत्ती योजना, शालेय फी, वसतिगृह फी प्रतिपूर्ती योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, पीकविमा, पोस्ट, लाडकी बहीण अशा विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन भरावे लागतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-ई-सेवा आणि सीएससी सेंटरवर गर्दी होते. परंतु, सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे माहिती भरताना व्यत्यय येतो. त्यामुळे अनेकजण या योजनांपासून वंचित राहू शकतात.
शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी महा-ई-सेवा केंद्र तसेच सीएससी सेंटरवर गर्दी करतात. परंतु, सर्व्हर नसल्यामुळे विलंब होतो. यामुळे नागरिकांना या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, ज्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून वारंवार सर्व्हर डाऊन होणार नाही, अशी मागणी होत आहे.
धान्य वितरणाचे सर्व्हर, ई पॉस मशीनमधील तांत्रिक समस्या यामुळे ग्राहकांना धान्य वेळेत मिळत नाही. सोमवारी रेशन दुकानदारांच्या संघटनेने अन्नधान्य वितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. रेशन दुकानदारांनी ई पॉस मशीन अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जमा करून निषेध व्यक्त केला.
“दुकानदारांच्या मागण्या राज्यस्तरीय असून त्यांनी दिलेले निवेदन राज्य सरकारला पाठवले जाईल.”
– प्रशांत खताळ, प्रभारी अन्नधान्यवितरण अधिकारी, पुणे.
कर्मचारीही त्रस्त
जुने रेशन कार्ड रद्द करून बाराअंकी कुटुंबपत्रिका काढण्यासाठी अर्जदार कुटुंबातील सर्व माहिती भरूनही अर्ज तहसील कार्यालयांतर्गत पुरवठा निरीक्षक पुरवठा विभागाकडून मान्यता मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक वेळा सर्व्हर डाउनमुळे नागरिकांसह कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.