पुणे: कोंढव्यात घडी सुटली, तुतारीचा सूर का लागला? “काम बोलतंय” म्हणणाऱ्यांना पक्ष बदलण्याची वेळ का आली?

new-project-2024-02-22t230505989_1708623317.jpg

पुणे | प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीटासाठी कार्यकर्त्यांची धावपळ, नाराजी आणि बंडखोरीचे राजकारण सर्वत्र सुरू असताना कोंढव्यात मात्र एक वेगळाच सूर लागलेला दिसतोय. अजित पवार यांच्या ‘घडी’चा गजर करणारे काही माजी नगरसेवक अचानक तुतारीच्या तालावर नाचू लागल्याने स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

कोंढवा प्रभाग क्रमांक १९ मधील कौसरबाग परिसरात ‘घडी’विरोधी वातावरण असल्याची चर्चा आधीपासूनच होती. स्थानिक पातळीवर पक्षालाच विरोध असेल, तर उमेदवार कोण आहे याला फारसा अर्थ राहत नाही, हेच गणित आता उघडपणे मांडले जात आहे. त्यामुळेच की काय, परवीन हाजी फिरोज, हाजी गफूर पठाण, रईस सुणके आणि नंदा लोणकर यांनी अचानक आपली राजकीय घडी बाजूला ठेवून तुतारी हाती घेतली.

मात्र हा बदल नेमका कशामुळे?
जनतेच्या आग्रहामुळे की “या पक्षातून जिंकता येणार नाही” या राजकीय भीतीपोटी?
की मग स्वतःच्या कामावर, स्वतःच्या नावावर की पक्षावरच विश्वास उरलेला नव्हता?

हा प्रश्न आता कोंढव्यातील चहाच्या टपऱ्यांपासून गल्लीबोळांपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष म्हणजे, “काम बोलत आहे” असा दावा करणाऱ्या माजी नगरसेवकांकडूनच पक्ष व चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर मग काम खरंच बोलत होतं की निवडणुकीपुरतंच बोलत होतं, असा खोचक सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

पक्ष बदलला, चिन्ह बदललं; पण जनतेचा कौल बदलेल का?
की हा सगळा प्रकार म्हणजे निवडणुकीआधीचा राजकीय डावपेच, सेटिंग आणि पडद्यामागील हालचालींचा भाग आहे?

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसं कोंढव्यातील राजकारण अधिक तापू लागलं आहे. कोणाचा सूर टिकणार, कोणाचा फसणार आणि आणखी कोण कोणत्या चिन्हाखाली उभा राहणार, याकडे आता संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलं आहे.

राजकारणात सूर बदलतात, वाद्य बदलतात; पण मतदार मात्र सर्व लक्षात ठेवतो — हेच कोंढव्यातील नेत्यांना कधी उमजणार?

Spread the love

You may have missed