पुणे: “एकाच निरीक्षकावर पुण्याची ‘आकाश चिन्ह’ जबाबदारी; अनधिकृत होर्डिंगला मोकळं रान

0
IMG_20260402_112950.jpg

पुणे : ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील आकाश चिन्ह विभाग सध्या तीव्र मनुष्यबळाच्या कमतरतेला सामोरे जात असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग रचनेत बदल करून नवीन भागांचा समावेश करण्यात आला असला, तरी त्या प्रमाणात कर्मचारी वाढवण्यात आलेले नाहीत. परिणामी, संपूर्ण विभागाची जबाबदारी जवळपास एका निरीक्षकावर येऊन पडली आहे.

कार्यालयात मूलभूत सुविधा देखील अपुऱ्या असल्याचे दिसून येते. बसण्यासाठी जागेचा अभाव असून अनेक ठिकाणी वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजासह अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईवर मोठा परिणाम होत आहे.

या परिस्थितीचा फायदा घेत शहरात अनधिकृत बॅनर व होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रस्त्यांच्या कडेला, चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आलेले फलक प्रशासनाच्या नजरेआड होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनीही या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना, प्रभाग वाढवताना आवश्यक मनुष्यबळाची तरतूद न केल्याची प्रशासनाची चूक असल्याचे नमूद केले आहे. एकाच निरीक्षकावर संपूर्ण विभागाची जबाबदारी टाकणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, नागरिकांकडून ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात तातडीने आकाश चिन्ह निरीक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा अनधिकृत होर्डिंग्जवर नियंत्रण ठेवणे कठीण होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि मनुष्यबळ वाढवण्याबाबत कोणते निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed