पुणे: महापालिकेचे आदेश धाब्यावर, शहरात अनधिकृत जाहिरातींचा सुळसुळाट; कारवाई फक्त कागदावर
पुणे: निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नागरिकांनी अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर, पोस्टर किंवा इतर जाहिराती लावू नयेत, असे स्पष्ट निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
शहरातील अनधिकृत जाहिरातींमुळे निर्माण होणाऱ्या विद्रूपीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेस १९ नोव्हेंबर रोजी स्पष्ट आदेश दिले. त्या अनुषंगाने, महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तथापि, महापालिकेने दिलेल्या सूचनांनंतरही मतदानानंतर काही तासांतच शहरातील सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांचे फ्लेक्स आणि जाहिरातफलक दिसू लागले आहेत. यावर महापालिकेने कोणतीही कारवाई करण्याची तसदी घेतलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवले जात आहेत
शहरातील अनधिकृत जाहिरातींबाबत न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू असून, न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने कारवाई करणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात ही कारवाई टाळली जात आहे. दोन्ही विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी एकमेकांना पाठबळ देत असल्याचा आरोप नागरिकांमध्ये केला जात आहे.
आचारसंहिता लागू असताना शहरात अनधिकृत जाहिरातींना आळा घालण्यात आला होता. मात्र, मतदान प्रक्रिया संपताच शहरभर अशा जाहिरातींनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाचे आदेश लागल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच शहरात अनधिकृत जाहिराती झळकू लागल्या आहेत, ज्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर शंका निर्माण झाली आहे.