पुणे: मसाज सेंटर की ‘मॅनेज’ सेंटर? शहरात रॅकेट फुल स्पीडमध्ये, पोलिस मात्र स्लो मोशनमध्ये!”

0
IMG_20260404_014548.jpg

पुणे: शहरातील उच्चभ्रू भाग सुरक्षित आणि शिस्तबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर कल्याणीनगरमधील कारवाईने मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला देहव्यापार इतक्या दिवसांपासून सुरू असताना पोलिसांना त्याची ‘वाऱ्याची चाहूल’ही लागली नाही, हेच आश्चर्यकारक आहे.

माहिती “मिळाल्यानंतर” पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली, ही बाब ऐकायला जरी सिनेमासारखी वाटत असली तरी प्रश्न असा आहे की, अशी माहिती मिळेपर्यंत प्रशासन नेमकं काय करत होतं? नियमित तपासण्या, गुप्त माहिती यंत्रणा आणि स्थानिक पाळत यांचं काय झालं, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

या प्रकरणात अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाकडून रॅकेट चालवलं जात होतं. म्हणजेच गुन्हेगारीला वयाची मर्यादा उरलेली नाही, पण त्याहून गंभीर बाब म्हणजे अशा प्रकाराला रोखण्यासाठी असलेली यंत्रणाच झोपेत असल्याचं चित्र समोर येत आहे.

कारवाईदरम्यान दोन तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना पैशाचं आमिष दाखवून या दलदलीत ओढण्यात आल्याचं उघड झालं. पण हा प्रकार इतक्या दिवसांपासून सुरू असताना कोणत्याही यंत्रणेला याची कल्पना नव्हती का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, अशी कुजबुज आता सुरू झाली आहे.

याशिवाय ‘राज’ नावाचा संशयित अद्याप फरार आहे. म्हणजेच कारवाई झाली असली तरी संपूर्ण जाळं उद्ध्वस्त झालंय का, याबाबत अजूनही संभ्रम आहे. “कारवाई झाली” एवढ्यावरच समाधान मानायचं की अशा रॅकेट्सना मूळापासून संपवण्याची जबाबदारी स्वीकारायची, हा प्रश्न आता पोलीस प्रशासनासमोर उभा आहे.

दरम्यान, पॉश भागात सुरू असलेल्या अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून “कारवाईनंतर नव्हे, तर आधीच गुन्हे रोखले गेले पाहिजेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अन्यथा, “घटना घडल्यावरच जाग येणं” हीच पुणे पोलिसांची नवी कार्यपद्धती आहे का, असा उपरोधिक सवाल उपस्थित होत आहे.

Spread the love

Leave a Reply