पुणे: खराडीतील ‘मार्व्हल सिट्रीन’ सोसायटीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ७७ हजारांचा मुद्देमाल आणि मोबाईल जप्त

पुणे : खराडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेल्या पोकर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खराडी पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री केली.
खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार, सातव वस्तीतील मार्व्हल सिट्रीन येथील १२ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये पोकर जुगार अड्डा सुरु असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्यासह तपास पथकाने छापा टाकला.
फ्लॅटमध्ये दोन मोठ्या टेबलांवर प्रत्येकी १२ जण बसून पोकर खेळताना आढळले. टेबलांवर पत्त्यांसोबत कॉईन ठेवलेले होते. खेळादरम्यान पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. या अड्ड्याचे आयोजन फ्लॅटचा मालक रोहिना संजय संगतानी यांचा मुलगा श्लोक संजय संगतानी (२९) आणि त्याचा चुलत भाऊ सिद्धांत संजीव ककर (३५) यांनी केले असल्याचे समोर आले आहे. जुगार खेळण्यासाठी लागणारे कॉईन हे दोघे पुरवत असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून ६ हजार ५०० रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ७७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस हवालदार महेश वामन नाणेकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.
—