पुणे: कमला नेहरूत ‘वेतनाचा चमत्कार’! वर्षानुवर्षे दुर्लक्ष, आता अडीच लाखांत १७ डॉक्टर हजर
पुणे, दि. १७ — “डॉक्टर मिळत नाहीत” अशी सबब देत वर्षानुवर्षे रुग्णांना ससूनकडे ढकलणाऱ्या पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अखेर वेतनवाढीचा ‘उपचार’ सापडला आहे. कमी वेतनामुळे कोणी फिरकत नसलेल्या रुग्णालयात अडीच लाख रुपयांचे मासिक वेतन जाहीर होताच तब्बल १७ तज्ज्ञ डॉक्टर आज रुजू होत आहेत. उशिरा का होईना, पण महापालिकेच्या लक्षात अखेर ‘वेतन दिलं तर डॉक्टर मिळतात’ हे सूत्र आले आहे.
मंगळवार पेठेतील महापालिकेच्या सर्वांत मोठ्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कायमस्वरूपी टंचाई होती. परिणामी सामान्य रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना ससून रुग्णालयाकडे पाठवण्याचा ‘सोपा मार्ग’ अवलंबला जात होता. महापालिकेने अनेक वेळा भरतीच्या जाहिराती दिल्या; मात्र ५०–७० हजारांच्या तुटपुंज्या वेतनावर तज्ज्ञ डॉक्टर येणार तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित होत होता.
दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर वास्तवाचा धक्का बसला. सुविधांसाठी १३ कोटी रुपयांची मंजुरी देत त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर न येण्यामागचे खरे कारण — कमी वेतन — ओळखले. स्थायी समितीनेही अखेर मंजुरी देत २५ तज्ज्ञ डॉक्टरांना अडीच लाख रुपये वेतन देण्याचा निर्णय घेतला.
वेतनवाढीची जाहिरात निघताच ‘डॉक्टर मिळत नाहीत’ हा जुना रेकॉर्ड अचानक बंद झाला. २५ जागांसाठी तब्बल ७६ अर्ज आले. छाननी आणि मुलाखतीनंतर १७ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये ७ स्त्रीरोगतज्ज्ञ, ६ बालरोगतज्ज्ञ, २ भूलतज्ज्ञ आणि २ फिजिशियन यांचा समावेश आहे, अशी माहिती उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
प्रश्न इतकाच की, हे शहाणपण आधी का सुचले नाही? वर्षानुवर्षे रुग्णांचे हाल होत असताना महापालिकेचे धोरणकर्ते कुठे होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तरीही उशिरा का होईना, कमला नेहरू रुग्णालयात डॉक्टरांची भर पडत असल्याने रुग्णांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आता तरी ‘वेतनकपात नव्हे, सेवा सुधारणा’ हा धडा महापालिका कायम लक्षात ठेवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.