पुणे: काळे तलाठींचा ‘काळा’ कारभार, नागरिकांत तीव्र संताप; लाललुचपत कारवाईनंतरही पुन्हा भ्रष्टाचाराची पुन्हा सुरुवात

bribe-1-1.jpg

तातडीने चौकशी न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

पुणे: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील काळे तलाठी यांनी आठ वर्षांपूर्वी लाचलुचपत विभागाच्या कारवाईत रंगेहात पकडले गेल्यानंतरही पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहार सुरू केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सस्पेन्शननंतर काही काळ पुण्यातील प्रांत कार्यालयात नियुक्त झालेले काळे, पुन्हा शिरूर तालुक्यात परत येऊन आपल्या नावाला साजेशी ‘विशाल’ कमाई करत असल्याचे उघड झाले आहे.

काळे यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असून, नोंदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे आरोप होत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी अनेक नोंदी प्रलंबित ठेवत बेकायदेशीर गुंठेवारीच्या नोंदी केल्याचेही समोर आले आहे. याशिवाय, कोरेगाव भीमा येथील नागरिकांकडून नोंदींसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट केल्याचे आरोप आहेत.

लालफितीचा आधार घेत पुन्हा नियुक्ती मिळवली
लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर संबंधित तालुक्यात पुन्हा नियुक्ती न करण्याचे परिपत्रक असतानाही काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेऊन मॅटच्या आधारे शिरूर येथे जैसे थे नियुक्ती मिळवली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

सणसवाडीतील घोडके तलाठीही आरोपी
सणसवाडी येथील तलाठी गोविंद घोडके यांच्यावरही काळेप्रमाणेच नागरिकांना लुटण्याचे आरोप आहेत. घोडके यांनीही बेकायदेशीर नोंदी केल्याचे आरोप असून, जांबुत येथून उड्डाण करून थेट सणसवाडीत येऊन कारभार सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

नागरिकांचा आक्रोश, कारवाईची मागणी
पैशांच्या हव्यासापोटी या दोन्ही तलाठ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून, नागरिकांनी त्यांच्या तातडीने दप्तर तपासणीची आणि दोषी आढळल्यास कडक कारवाईची मागणी केली आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

तातडीने या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

Spread the love