पुणे: बांगलादेशी अल्पवयीन तरुणीच्या तस्करीप्रकरणी मुख्य एजंट पसार; पुण्यातील बुधवार पेठेत विक्री
पुणे, दि. १ (प्रतिनिधी) – बांगलादेशातून अल्पवयीन तरुणीला बेकायदेशीररित्या भारतात आणून पुण्यातील बुधवार पेठेत तिची विक्री करून जबरदस्तीने वेश्याव्यवसायास लावल्याच्या गंभीर प्रकरणात मुख्य एजंट अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून चार महिलांसह एका पुरुषाला अटक केली असली, तरी आंतरराष्ट्रीय मानव तस्करीमागील सूत्रधार फरार असल्याचे समोर आले आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीतून बांगलादेश–कोलकाता–पुणे असा तस्करीचा साखळीबद्ध मार्ग उघडकीस आला आहे. २०२३ मध्ये अवघ्या १५ वर्षांची असताना संबंधित तरुणीला बांगलादेशातून भारतात आणण्यात आले. त्यानंतर कोलकातामार्गे पुण्यातील बुधवार पेठेत आणून तिची विक्री करण्यात आली व जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलण्यात आले, असा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या संपूर्ण व्यवहारामागे फरदीन (रा. बांगलादेश) हा मुख्य एजंट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणात फरासखाना पोलिसांनी फरदीनसह विमल दास (कोलकाता), स्वीटी घाटक, मोसमी बेगम तारू, मुस्कान कांबळे, सलमा शेख, बाबूभय्या उर्फ पापा शेख आणि संजय (सर्व रा. बुधवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यापैकी चार महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ही मानव तस्करी आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असल्याने तपास अधिक व्यापक करण्यात येत असून, संबंधित नेटवर्क उघड करण्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली.