पुणे: कल्याणीनगरमधील बेकायदेशीर रूफटॉप बारांचा मुद्दा ‘कॉफी विथ अजितदादा’मध्ये गाजला

IMG-20260112-WA0028.jpg

पुणे : नगर रोडवरील फोर पॉईंट हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ अजितदादा’ या संवादात्मक सत्रात कल्याणीनगर परिसरातील रहिवाशांनी निवासी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर रूफटॉप बार व रेस्टॉरंट्सचा गंभीर मुद्दा उपस्थित केला.

पहा व्हिडिओ

कल्याणीनगरमधील रहिवासी मोनिका शर्मा, यास्मिन चारानिया, राजेश्वरी, हरेश हरख आणि कुंदन यांनी या सत्रादरम्यान थेट आपली व्यथा मांडत संबंधित बेकायदेशीर आस्थापनांविरोधात लेखी तक्रारीही सादर केल्या. निवासी इमारतींमध्ये व्यावसायिक वापर करून सुरू असलेले बार, पार्किंगची सोय नसणे, अग्निशमन विभागाचे (फायर एनओसी) उल्लंघन, प्रचंड ध्वनीप्रदूषण आणि सुरक्षिततेचे प्रश्न यामुळे परिसरातील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील (महापालिका प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५) नागरी व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर मोकळा संवाद साधण्यासाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी रहिवाशांनी बेकायदेशीर रूफटॉप बारमुळे शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत असल्याचे अधोरेखित करत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांनुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि पुणे शहरासाठी व्यवहार्य उपाययोजना शोधणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच विविध सोसायट्यांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

You may have missed