पुणे: हृदयशस्त्रक्रिया की निष्काळजी प्रयोग? प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांवर गुन्हा दाखल

0
newindianexpress_2025-03-14_qtc0aovz_202503143351079.jpg

पुणे : शहरात ‘नाव मोठं, काम ढिसाळ’ या म्हणीचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राममंगल हॉस्पिटलमध्ये झालेल्या हृदयशस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला आणि तब्बल वर्षभरानंतर वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका अधिकृतपणे ससून रुग्णालयाच्या समितीने ठेवला. त्यानंतर वानवडी पोलिसांना जाग येत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ ऑक्टोबर २०२४ रोजी हृदयशस्त्रक्रिया, “सगळं ठणठणीत” असा दावा करून रुग्णाला घरी सोडायचं, आणि महिन्याभरात निमोनियाने मृत्यू—हा वैद्यकीय चमत्कार की निष्काळजीपणाचा पराक्रम, असा सवाल उपस्थित झाला आहे. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात रुग्णाच्या जीवाशी खेळ झाला का, असा थेट आरोप मृत महिलेचे पुत्र विजय जायभाये यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयातील उपचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, सत्य बाहेर यायला ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अहवाल लागावा लागतो, हीच व्यवस्था किती “जलद” आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अखेर समितीने स्पष्ट शब्दांत वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच लिलावती जायभाये यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवला आणि डॉक्टरांच्या ‘प्रतिष्ठेच्या कवचाला’ तडा गेला.

राममंगल हॉस्पिटलमधील कागदपत्रे जप्त, चौकशी सुरू आणि आता गुन्हा दाखल—मात्र प्रश्न कायम आहे, तो म्हणजे, अशी प्रकरणे समोर येईपर्यंत किती रुग्णांचे जीव धोक्यात येतात? मोठ्या नावाच्या डॉक्टरांना आणि आलिशान रुग्णालयांना जबाबदारीची जाणीव कधी होणार, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरू असला, तरी “उशिरा का होईना, पण न्यायाची चाहूल” लागली, असे म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, वैद्यकीय निष्काळजीपणावर कठोर कारवाई झाली नाही, तर ‘उपचार’ हेच रुग्णांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed