पुणे: आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव – व्हिडिओ
पुणे : शहरातील महापालिकेची आरोग्य व्यवस्था अक्षरशः ‘व्हेंटिलेटरवर’ गेल्याचा घणाघाती आरोप करीत आम आदमी पार्टीने सोमवारी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांना कार्यालयातच घेराव घातला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना अपेक्षित आरोग्य सुविधा न मिळणे आणि औषधे बाहेरून विकत घेण्यास भाग पाडणे याविरोधात हा निषेध नोंदविण्यात आला.
पहा व्हिडिओ
आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात कुमार घोंगडे, अनिकेत शिंदे, प्रदीप उदागे, शेखर ढगे, मनोज शेट्टी, इब्राहिम सय्यद, नौशाद अन्सारी यांसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
रुग्णालयातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त
महापालिका रुग्णालयांमधील औषधटंचाई, सुविधांचा अभाव आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. माजी सभासद किंवा प्रस्थापित व्यक्तींना मिळणाऱ्या तत्पर सेवांच्या तुलनेत सामान्य नागरिकांना योग्य उपचारांसाठी ताटकळत ठेवले जात असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.
वाढीव हद्दीत आरोग्य सुविधा अपुऱ्या
२०१२ मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये महापालिका अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा उभारण्यात अपयशी ठरल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. अनेक प्रसूतीगृहांमध्ये पूर्वनियोजित सिझेरियन शस्त्रक्रिया होत असल्या तरी आपत्कालीन स्थितीत गरोदर महिलांना कमला नेहरू रुग्णालयात, तेथून पुढे ससून रुग्णालयात पाठवले जाते, अशी अस्वस्थ करणारी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून सर्व नागरिकांना समप्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.