पुणे: सराईताशी ‘मैत्री’ महागात! पोलीसच गुन्हेगारांच्या जाळ्यात?”
पुणे : शहरात गुन्हेगारी आटोक्यात आणण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर, तेच पोलीस कर्मचारी सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचे वारंवार समोर येत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समर्थ पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखण्याची कारवाई म्हणजे केवळ “औपचारिक शिक्षा” असल्याची चर्चा रंगली आहे.
सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरातील सराईत प्रवीण चव्हाण याच्याविरुद्ध जुगार, मटका आणि बेकायदा शस्त्र बाळगण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्याचे पोलीसांशी ‘संबंध’ कायम राहतात, ही बाब अधिक धक्कादायक मानली जात आहे. संबंधित पोलीस कर्मचारी वैद्यकीय रजेवर असताना गुन्हेगाराच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्यानंतर कारवाई झाली खरी; मात्र “दोन वर्षांची शिक्षा कमी करून एक वर्ष” करण्यामागे नेमके कोणते दबाव किंवा सहानुभूती होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यापूर्वीही गुन्हे शाखेतील दोन कर्मचाऱ्यांना याच सराईताशी संबंध आल्याने निलंबित करण्यात आले होते. तरीदेखील अशा घटना पुन्हा घडत असल्याने “पोलीस विभागात शिस्त आहे की नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
मोबाइलच्या तांत्रिक तपासणीतून उघड झालेल्या या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेतील अंतर्गत नियंत्रण यंत्रणा कितपत प्रभावी आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी काही पोलीसच त्यांच्याशी ‘जवळीक’ ठेवत असतील, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर?
एकीकडे शहरात मटका-जुगार अड्ड्यांवर कारवाईचे ढोल बडवले जातात, तर दुसरीकडे त्याच अड्ड्यांशी संबंधित व्यक्तींशी पोलीसांचे संबंध उघड होणे म्हणजे “एक हाताने कारवाई, दुसऱ्या हाताने मैत्री” अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारांवर केवळ किरकोळ शिक्षा न करता कठोर आणि उदाहरणात्मक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.