पुणे: डॉक्टरांचे काम न करता पगार;  भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्याल उपेक्षित; आरोग्य प्रमुखांच्या तंबीचाही परिणाम शून्य

0
Atal-Bihari-Vajpayee-Medical-College.jpg

पुणे : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टर कामावर न हजर राहूनही पगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या वैद्यकीय महाविद्यालयाचा कमला नेहरू रुग्णालयाला काहीच उपयोग होत नाही.

“दैनिक महा मेट्रो” ने दिलेल्या वृत्तानुसार, या वैद्यकीय महाविद्यालयाचे पाचवे वर्ष असून, येथे सुमारे ५०० विद्यार्थी व पाचशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. २२ विभागांपैकी चौदा विभागातील डॉक्टरांनी शेजारीच असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात रूग्णसेवा देणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक डॉक्टर रुग्णालयात फिरकतच नाहीत. त्यामुळे या डझनभर डॉक्टरांचा पगार रोखावा, अशी शिफारस कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत बोते यांनी महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांकडे केली आहे.

हजेरी लावून बाहेर

तज्ज्ञ डॉक्टरांना तब्बल दोन लाख, सहाय्यक डॉक्टरांना दीड लाख आणि इतरांना साठ ते सत्तर हजार पगार मिळत असतानाही, अनेकजण रुग्णालयात हजेरी लावून लगेच बाहेर पडतात. दुपारीच डॉक्टर घरी जाण्याचे प्रकार नियमित सुरू आहेत. विशेष म्हणजे, डॉक्टरांवर देखरेख ठेवणारे वरिष्ठ अधिकारीसुद्धा दुपारी बैठकीच्या कारणावरून बाहेर पडतात.

विद्यार्थीही नियमभंगात

सध्या महाविद्यालयात ४०० हून अधिक विद्यार्थी आहेत. मात्र, बहुतांश विद्यार्थी आयकार्ड व अॅप्रन घालत नाहीत. त्यामुळे कर्मचारी, डॉक्टर आणि विद्यार्थी यात फरक ओळखणे कठीण होते. काही विद्यार्थी महाविद्यालयात हजेरीच लावत नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेचा प्रश्नच येत नाही.

अधिकाऱ्यांच्या तंबीचा परिणाम नाही

महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी संबंधितांना तंबी दिली असली, तरी परिस्थितीत बदल झालेला नाही. रुग्णालयात ५० डॉक्टर कार्यरत असल्याचे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात दुपारनंतर बरेचसे डॉक्टर घरी जातात.

अधिकृत प्रतिक्रिया

“भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांचा पगार थांबविण्यात आला आहे. ही वस्तुस्थिती आहे,” असे अधिष्ठाता डॉ. सीमा प्रतिनिधी यांनी स्पष्ट केले.

Spread the love

Leave a Reply

You may have missed