पुणे: सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांची पोलिसांकडे तक्रार
पुणे: हडपसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) उमेदवार प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अझहर तांबोळी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत सुदामराव जगताप (वय ४७, रा. अनुसया निवास, वानवडी) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, अझहर तांबोळी आणि त्यांच्या साथीदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. या प्रकारामुळे जगताप यांची सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जगताप हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सोशल मीडियावरील या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. बेंद्रे करत आहेत. अद्याप या प्रकरणी पुढील तपशील मिळालेला नाही.