पुणे: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?

पुणे शहरातल्या कोथरूड पोलीस ठाण्यातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी आणलेल्या तीन दलित तरुणींवर पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधील एका २३ वर्षीय विवाहित महिलेशी संबंधित आहे. ही महिला आपल्या पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पुण्यात आली होती. या महिलेला मदत केल्याबद्दल पोलिसांनी पूर्वसूचना किंवा कोणतेही वॉरंट न देता पुण्यातील तीन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात नेऊन पाच तास रिमांड रुममध्ये डांबून ठेवले, असा आरोप आहे.
पहा व्हिडिओ
पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना एका पीडित तरुणीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, पोलीस त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांनी जातीवाचक आणि खासगी आयुष्याबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी केली. तसेच, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घरात घुसून बाथरुम आणि बेडरूममध्येही तपासणी केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या इनरवेअरचीही तपासणी केल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला.
तरुणींनी या कृतीचा जाब विचारला असता, पोलिसांनी ‘पोलीस स्टेशनमध्ये चला, आम्ही दाखवतो’ अशी धमकी दिल्याचेही तिने सांगितले. पोलीस ठाण्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांचा लैंगिक अपमान करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन
या घटनेनंतर पीडित तरुणींनी आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केले. आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत चर्चा होऊनही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे पीडित आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी तीन ओळीचे पत्र दिले…!
मुलींनी ज्याबाबत तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.