पुणे: बुधवार पेठेत ‘कोम्बिंग’ की ‘पब्लिक परेड? पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह; मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला मुद्दा; गुन्हा नोंद नाही, पण शिक्षा तयार? बुधवार पेठेत पोलिसांवर आरोप
पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी तब्बल १० तास राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशननंतर आता कारवाईपेक्षा पद्धतीवरच अधिक चर्चा रंगू लागली आहे. गुन्हेगारांवर कारवाई करताना ग्राहकांना रस्त्यावर बसवून ‘सार्वजनिक धडा’ शिकवण्याचा प्रकार नेमका कायदेशीर होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणी तुषार देवीदास झेंडे पाटील यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग गाठत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये काही अल्पवयीन मुलींची सुटका, दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेणे आणि एका व्यक्तीकडून अमली पदार्थ जप्त करणे अशा कारवाया झाल्या. कायदेशीर कारवाईवर कोणी आक्षेप घेतलेला नसला, तरी ‘ग्राहकांशी’ केलेली वागणूक अमानवी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा दावा आहे की, कोणताही गुन्हा तत्काळ दाखल नसताना अनेकांना तासनतास रस्त्यावर बसविण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी ओळख उघड होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. “गुन्हा सिद्ध होण्याआधीच शिक्षा?” असा प्रश्न उपस्थित करत ही वागणूक मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आयोगाकडे करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये संपूर्ण कारवाईची सखोल चौकशी, पोलिस आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविणे, ऑपरेशनदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, लॉगबुक आणि ताबा नोंदी तपासणे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यांना नुकसानभरपाई देण्याची शिफारस करावी, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.