पुणे: प्रशासकीय ‘शॉक’ आणि अंधारातली जनता: वीज कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर!
पुणे: प्रगत शहराचा दावा करणाऱ्या पुणे महानगरपालिका हद्दीतील कलवड वस्तीत सध्या नागरिक नरकयातना भोगत आहेत. पण हे संकट नैसर्गिक नसून पूर्णतः वीज कंपनीच्या (MECB) नियोजित अकार्यक्षमतेचा परिणाम आहे.
अक्षम्य दिरंगाई आणि तांत्रिक अज्ञान
कलवड भागात वस्ती वाढली, नागरिक वाढले, हे सत्य गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यासमोर असतानाही वीज कंपनीचे अधिकारी झोपा काढत होते का? जो भाग दाट वस्तीचा आहे, तिथे आजही क्षमतेपेक्षा कमी म्हणजे केवळ २०० केव्हीचा (KV) ट्रान्सफॉर्मर लावून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. वारंवार वीज खंडित होणे आणि ट्रान्सफॉर्मर जळणे या घटनांनी नागरिकांचे जगणे कठीण झाले असताना, प्रशासनाला जाग येण्यासाठी लोकप्रतिनिधींना रफिकभाई शेख कार्यालयावर धडक द्यावी लागली, हेच या कंपनीचे मोठे अपयश आहे.
उघड्या तारा आणि जीवघेणा निष्काळजीपणा
केवळ वीज जाणे हाच प्रश्न नसून, गल्लीबोळांत लटकणाऱ्या उघड्या तारा आणि ट्रान्सफॉर्मरपाशी असलेला तारांचा गुंता म्हणजे मृत्यूला दिलेले आमंत्रणच आहे. अनेक ठिकाणी या हाय-व्होल्टेज (HT) तारा घरांच्या गॅलरीपर्यंत पोहोचल्या आहेत. हे सर्व माहीत असूनही अंडरग्राउंड केबलिंगची कामे का रखडवली गेली? तांत्रिक बिघाड झाल्यास अधिकारी तातडीने उपलब्ध होत नाहीत आणि नागरिकांना तासनतास अंधारात राहावे लागते, याला जबाबदार कोण?
जबाबदारी झटकण्याचे धोरण
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, स्वतःच्या पायाभूत सुविधा सुधारण्याऐवीजी वीज कंपनीचे अधिकारी जनतेलाच सल्ले देत आहेत. “पाण्याच्या मोटारी लावू नका”, “इंडक्शन वापरू नका” असे अजब सल्ले देऊन कंपनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिक रीतसर वीज बिल भरतात, मग त्यांना आवश्यक ती वीज पुरवणे हे कंपनीचे कर्तव्य नाही का?
पहा व्हिडिओ
आता तरी सुधारणा होणार का?
आंदोलनांचा इशारा दिल्या नंतर आता ३१५ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे गाजर दाखवले जात आहे. पण हे काम केवळ कागदावर न राहता तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच, अनधिकृत जोडण्यांचे कारण पुढे करून प्रामाणिक ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. जर येत्या काही दिवसांत कलवडमधील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही, तर संतापलेल्या जनतेचा ‘शॉक’ सहन करण्याची तयारी वीज कंपनीने ठेवावी.