पुणे: रात्री घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह युनिट-४ कडून जेरबंद

IMG-20250924-WA0033.jpg

पुणे : गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने घरफोडी करणाऱ्या आरोपीस सोन्याच्या दागिन्यांसह अटक केली आहे. या कारवाईत जवळपास २ लाख ९८ हजार ४८० रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. संयुक्त आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख तसेच मा. उप आयुक्त श्री. निखिल पिंगळे आणि मा. सहायक आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली.

२४ सप्टेंबर रोजी येरवडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम व पथकाला बातमी मिळाली की, “एक इसम चोरीचे सोने विक्रीसाठी खडकीकडे जाणार आहे.” त्यानुसार होळकर ब्रिज परिसरात सापळा रचून विशाल संपत चंदनशिवे (वय २२, रा. चंदननगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपीकडून सोन्याचे दागिने हस्तगत झाले. पुढील तपासात उघड झाले की, त्याने खराडी येथील दोन वेगवेगळ्या बंद घरांमध्ये घरफोडी केली होती. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीकडील दागिने संबंधित गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.

या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, फौजदार एकनाथ जोशी, पोलीस हवालदार अमजद शेख, तुषार खराडे, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, किशोर दुशिंग, विनोद महाजन, नागेशसिंग कुंवर, देवीदास वांढरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे व शरद झांजरे यांनी सहभाग नोंदवला.

आरोपीस वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी खराडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love