पुणे; हुक्का पार्लरवर कारवाई रोखण्यासाठी २० हजारांचा हप्ता!वानवडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निलंबित!
पुणे : वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्त प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार याने हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका हॉटेलचालकाकडून दरमहा २० हजार रुपये हप्ता घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पवार याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी छापा टाकला. तपासादरम्यान हॉटेलमालकाच्या मोबाईलमध्ये विशाल पवार याचा क्रमांक आढळून आला. चौकशीत हॉटेलमालकाने पवार याला संरक्षण रकमेसाठी हप्ता दिल्याची कबुली दिली. यानंतर अधिकृत चौकशी करून पवार याचे वर्तन शिस्तभंग करणारे आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारे असल्याचे स्पष्ट झाले.
विशाल पवार याची १ डिसेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यातून बदली झाली होती. त्याला पुढील एक वर्षासाठी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्याने हुक्का पार्लरवर कारवाई होणार असल्याची माहिती हॉटेलमालकाला पुरवली होती.
हप्तेखोरी प्रकरणात आणखी एक पोलीस निलंबित
यापूर्वी देखील वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र राजाराम पवार याला हुक्का पार्लर चालू ठेवण्यासाठी दरमहा सहा हजार रुपये हप्ता घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्याच्या निलंबनाची कारवाई केली होती.
बेकायदा धंद्यांवर कठोर कारवाईचा इशारा
शहरातील बेकायदा धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. हुक्का पार्लर प्रकरणी कठोर पावले उचलत २६ डिसेंबर रोजी पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू आणि इतर साहित्य जप्त केले.