पुणे ‘ड्रग्जमुक्त’ की फक्त घोषणामुक्त? कोंढवा-येरवडा ‘हॉटस्पॉट’ कायम; ‘माझा प्रभाग ड्रग्जमुक्त’ की ‘कागदावरच स्वच्छ’? नागरिकांचा सवाल! वाचा सविस्तर

0
IMG_20260326_123223.jpg

पुणे : एकीकडे शहराला ‘ड्रग्जमुक्त’ करण्याच्या घोषणा, तर दुसरीकडे कोंढवा, येरवडा, खडकसारखे भाग सर्रास अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेले — अशा विरोधाभासी परिस्थितीत पुणे पोलिसांची कार्यपद्धती पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात आली आहे.

गुन्हे शाखेच्या बैठकीत मोठमोठे निर्णय घेतले जातात, “मुळापर्यंत जाऊ” अशा घोषणा दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात ड्रग्जची साखळी तोडण्याऐवजी केवळ किरकोळ कारवाईतच पोलिस अडकले असल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे तेच ‘हॉटस्पॉट’ भाग पुढे येत असताना, आतापर्यंत नेमके काय साध्य झाले? हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

पोलिस आयुक्तांकडून “अँटी-ड्रग्ज पथक”, “अॅप”, “अत्याधुनिक यंत्रणा” यांची घोषणा करण्यात आली असली, तरी नागरिकांचा अनुभव काही वेगळाच सांगतो. “कारवाई होते, पण ड्रग्ज बंद होत नाहीत” अशी थेट प्रतिक्रिया अनेक भागांतून ऐकायला मिळत आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या विश्लेषणात तब्बल २२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ड्रग्जचे जाळे असल्याचे उघड झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर समस्या असताना, आतापर्यंत ती नियंत्रणात का आली नाही? याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.

दरम्यान, “माझा प्रभाग ड्रग्जमुक्त” अशा उपक्रमांत नगरसेवकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी हा उपक्रम प्रत्यक्षात किती प्रभावी ठरणार, की फक्त कागदोपत्रीच राहणार — याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरवेळी नवीन योजना, नवीन पथके आणि नवीन घोषणा… पण प्रश्न एकच —
पुणे खरंच ड्रग्जमुक्त होणार, की फक्त बैठकीतच ‘मुक्त’ राहणार?

Spread the love

Leave a Reply

You may have missed