मुख्यमंत्री, मंत्री नाही… अरे हे तर पोलीस आयुक्त! पुणेकरांचा संताप — ‘VIP’ दर्शनासाठी शहर ठप्प!

पुणे : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही आणि त्यावर उपाय शोधायचे सोडून आता स्वतःच ‘VIP’ संस्कृतीचा अवलंब! पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (१ ऑक्टोबर) संध्याकाळी सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर शहरात अक्षरशः वाहतूक ‘लॉकडाउन’सदृश परिस्थिती निर्माण झाली.
स्वारगेटहून सिंहगड रोडकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आली. चौक बंद, पोलिसांचा बंदोबस्त, सायरनचे आवाज आणि वाहनांच्या रांगा — सगळं चित्र पाहून लोकांना वाटलं, मुख्यमंत्री आले असावेत! पण शेवटी कळलं, हे तर आपल्या शहराचेच पोलीस आयुक्त आहेत!
नागरिकांच्या चेहऱ्यावरचा प्रश्न एकच — “वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर, तेच वाहतूक बंद करत असतील तर पुणेकरांनी कोणाकडे दाद मागायची?”
पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री येणार असतील, तर थोडी गैरसोय नागरिक समजू शकतात. पण एका ‘दर्शनासाठी’ संपूर्ण परिसर ठप्प करणे ही पोलीस आयुक्तांकडूनच झाली, हे ऐकून पुणेकरांच्या संयमाचा बांध तुटला.
सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली —
“गुन्हेगारी वाढतेय, वाहतूक ठप्प आहे… आणि आयुक्त साहेब VIP दर्शनात व्यस्त आहेत!”
“रस्ते बंद करण्याची परवानगी फक्त मंत्र्यांना नाही का? की आता पोलीस आयुक्तांच्याही ‘झेड’ भावना जाग्या झाल्या?”
संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी सारसबाग परिसरात झालेल्या या वाहतूक बंदोबस्तामुळे नागरिक अक्षरशः अडकले. कोणी ऑफिसवरून घरी जायला निघालेले, कोणी मुलांना घ्यायला निघालेले — पण सगळेच रस्त्यातच थांबले.
शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिक त्रस्त आहेतच, त्यात आता ‘VIP’ पोलीस आयुक्तांच्या दौर्याने आणखी वैताग वाढवला आहे.