पोलिसांचे मोठे यश : वारजे, कोंढवा, येरवडा आणि वडारवाडीतून तडीपार गुन्हेगारांना अटक
पुणे : तडीपार आदेशाचे उल्लंघन करत शहरात वावरणाऱ्या चार गुंडांना पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली.
वारजेतील पियुष जाधवला अटक
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाच्या अंमलदारांना पियुष ऊर्फ कान्हा जाधव (वय २०) वारजे जकात नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. तातडीने कारवाई करत पथकाने त्याला अटक केली. पियुषला यावर्षी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र, तो शहरात आल्याने त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडारवाडीत लवकुश चौहान जाळ्यात
गुन्हे शाखा युनिट ४ ने वडारवाडीतील पांडवनगर येथून तडीपार गुंड लवकुश चौहान (वय २२) याला अटक केली. त्याला २० सप्टेंबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, आदेशाचे उल्लंघन करत तो घरी परतला होता.
येरवड्यात आकाश राठोडला पकडले
येरवडा परिसरात चिमा घाट पर्णकुटी येथे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आकाश राठोड (वय ३०) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ३१ डिसेंबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. आदेशाचा भंग करत तो शहरात थांबला होता.
कोंढव्यात मनोज सोनटक्के अटकेत
गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड येथे तडीपार गुंड मनोज सोनटक्के (वय २९) याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. एप्रिल २०२४ पासून एक वर्षासाठी तडीपार असलेल्या मनोजने आदेशाचा भंग करत घरी परतण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांचे कडक पाऊल
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत तडीपार गुंड शहरातच रहात असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.