महापालिकेत गैरव्यवहाराचा आरोप; आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; तोंडी आदेश, खोटे पत्र, आणि केवळ सौम्य शिक्षा? कारवाई केवळ वेतनवाढीवरच सीमित

IMG_20250418_113728.jpg

पुणे : महापालिकेतील उपायुक्त माधव जगताप यांनी केलेल्या कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई न करता केवळ दोन वेतनवाढी रोखण्याची सौम्य कारवाई करण्यात आली आहे. या प्रकाराचा निषेध करत भाजपचे प्रवक्ते ॲड. मधुकर मुसळे आणि माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना मुसळे दांपत्याने सांगितले की, अतिक्रमण विभागाचे प्रमुख असताना माधव जगताप यांनी औंध येथील शिवदत्त मिनी मार्केट प्रकरणात बेकायदेशीररित्या ३० परवाने वाटप केले. त्यांनी आयुक्तांच्या नावाने खोटे पत्र सादर करून विविध गैरप्रकार घडवले असून, या घोटाळ्यात इतर अधिकारीही सामील आहेत. मात्र, संबंधित इतर अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

तसेच, आपले अधिकारक्षेत्र ओलांडत कनिष्ठ अधिकाऱ्यांना तोंडी व लेखी आदेश देत जगताप यांनी आयुक्तांची दिशाभूल केली होती, असा आरोपही मुसळे यांनी केला. हे सर्व आयुक्तांना ज्ञात असूनही त्यांनी सौम्य पद्धतीने कारवाई करून प्रकरण थोपवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिळकतकर विभागातही जगताप यांनी चुकीची कामकाज केली असून, त्यावरही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे मत भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

महापालिकेतील कारभार व प्रशासनातील पारदर्शकतेवर या प्रकरणामुळे नव्याने चर्चा रंगू लागली आहे.

Spread the love

You may have missed