स्वारगेट प्रकरणानंतर महापालिकेची सुरक्षा अधिक कडक; सुट्टीच्या दिवशी विनापत्र महापालिका भवनात प्रवेशास बंदी

पूणे: स्वारगेट बस स्थानकातील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सुट्टीच्या दिवशी महापालिका भवनात प्रवेशासंबंधी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, कोणताही स्थायी कर्मचारी, कंत्राटी कामगार किंवा मानधन तत्वावरील कर्मचारी संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांचे नाव असलेले पत्रांशिवाय भवनात प्रवेश करू शकणार नाही.
महापालिका अधिकारी राकेश विटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या दिवशी भवनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील उद्याने, शाळा आणि दवाखान्यांमध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती ओळखणे, चोरट्यांना अडवणे आणि पोलिसांच्या ताब्यात देण्याचे तंत्र याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सुरक्षा विभागाने या निर्णयानंतर सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये अधिक दक्षता घेतली आहे.