पुणे शहरः ८ ऑगस्टला पुण्यात पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा, पत्रकार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष सोनवनेंची माहिती – व्हिडिओ
पुणे : गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुळा-मुठा नदी काठाच्या अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक गोरगरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता, पुरामुळे बाधित झालेल्या अंदाजे 10 हजार कुटुंबांना त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी; तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने येत्या गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कचेरी ते महानगरपालिकेपर्यंत ‘पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी या विषयी माहिती दिली. यावेळी प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, शाम सदाफुले आदी उपस्थित होते.
संजय सोनवणे म्हणाले, गेल्या अनेक आठवड्यांपासून पुणे शहरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे ९० टक्के भरली आहेत. तसेच खडकवासला धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरत आहे. पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावी पुणे शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधित झाली आहेत. मात्र, शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
परशुराम वाडेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे सगळे पुणेकर हवालदिल झाले आहेत. नदी सुधार योजनेमुळे नदी पात्राची रुंदी कमी झाली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम, नदीमध्ये राडारोडा टाकणे, मनपाची विविध विकास कामे, नदी पात्रातील अतिक्रमणे, नाल्यावरील अतिक्रमणे यामुळे नदी पात्रातील पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरत आहे. पूर्वी ९० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्यावर येणारा पुर आता २८ हजार क्युसेस पाणी सोडल्यावर येत आहे. या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.