पुणे : विमाननगरमध्ये पबवर ‘रेड’, पण अवैध धंद्यांवर पोलीस ‘ब्लाइंड’?
पुणे : विमाननगरमधील ‘द नॉयर’ (रेड जंगल) पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे टाकलेल्या छाप्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, या कारवाईमुळे एक वेगळाच प्रश्न ऐरणीवर आला आहे— एका पबवर ‘रेड’, पण संपूर्ण विमाननगरमधील अवैध धंद्यांवर पोलीस इतके ‘ब्लाइंड’ का?
पहा व्हिडिओ
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या कारवाईत महिला व पुरुष मिळून ५० जणांना ताब्यात घेतले, तर पब मालकासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमारे ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल, १७८ विदेशी मद्याच्या बाटल्या, साउंड सिस्टिम, लॅपटॉप, फॉग मशीन असा ‘पार्टीचा संपूर्ण संसार’ जप्त करण्यात आला. छापा यशस्वी ठरल्याचा दावा विभागाने केला असला, तरी या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात २१ भरारी पथके कार्यरत असल्याचा दावा उत्पादन शुल्क विभाग करत आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते विमाननगरमध्ये दररोज उघडपणे सुरू असलेले अवैध धंदे कोणत्याच पथकांना दिसत नाहीत. रात्रभर सुरू असलेल्या भुर्जी पावच्या गाड्या, टपऱ्यांवर खुलेआम विमल गुटख्याची विक्री, टेरेसवर चालणारी अवैध हॉटेल्स—हे सगळं पोलिसांच्या नजरेआड कसं काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
एका पबवर छापा टाकून ‘कडक कारवाई’चा गजर केला जातो, पण त्याच परिसरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बेकायदा व्यवसायांवर मात्र कारवाईचा पत्ता नाही. ‘रेड’ हे फक्त कॅमेऱ्यासाठीच असतात की संपूर्ण विमाननगरसाठी? असा टोमणा आता खुलेआम मारला जात आहे.
विशेष म्हणजे, नियम धाब्यावर बसवणाऱ्या पब व रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. एका नामांकित बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाचा कथित सहभाग असलेल्या प्राणघातक पोर्शे अपघातानंतर हे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, ‘द नॉयर’ पबचा प्रकार पाहता हे आदेश प्रत्यक्षात कितपत अंमलात आहेत, यावरच प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यातून एक धक्कादायक बाब समोर आली—विमाननगर पोलीस ठाण्याला या पबमधील बेकायदेशीर कारभाराची साधी कल्पनाही नव्हती. पोलिसांच्या नाकाखाली हा पब पहाटे पाच वाजेपर्यंत दारू विक्री आणि पार्टी करत होता. विमाननगर पोलिसांना हे खरंच दिसलं नाही, की न दिसण्याचा सोयीस्कर निर्णय घेतला गेला? असा रोखठोक सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
एकीकडे उत्पादन शुल्क विभाग कारवाईचा डंका पिटतो, तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा आरोप होत आहे. विमाननगरमध्ये कायद्याचा धाक आहे की केवळ देखाव्याची कारवाई? याचे उत्तर मात्र अद्यापही मिळालेले नाही.