पुणे: ‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा केलात तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीतच! हॉटेल्सना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सशर्त परवानगी; नियमभंगावर तात्काळ कारवाईचा इशारा
पुणे, (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब व क्लबना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र ध्वनिप्रदूषण, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी, नियमबाह्य मद्यविक्री किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणारे प्रकार आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दरवर्षी ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषात मद्यप्राशन करून वाहन चालवणे, भररस्त्यात धिंगाणा, मारामारी, महिलांची छेडछाड अशा घटना घडताना दिसतात. यंदा मात्र परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. महापालिका निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने शहरातील हालचाली वाढल्या असून, कायदा व सुव्यवस्था राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त, नाकाबंदी व गस्त वाढवली आहे.
मद्यधुंद चालकांवर कडक कारवाई
नाकाबंदी दरम्यान ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास वाहन जप्ती, दंड आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार आहे.
निवडणुकांचा माहोल, पोलिस अधिक सतर्क
निवडणुकांमुळे शहरात कार्यकर्ते व प्रचारयंत्रणा सक्रिय असल्याने यंदाचा ‘थर्टी फर्स्ट’ अधिक गजबजलेला ठरण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन अतिरिक्त सतर्कतेने उपाययोजना राबवत असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.