पुणे: आर्यन वर्ल्ड स्कूलवर गुन्हा दाखल; बेकायदा शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार; मान्यता नाही, पण फी फुल्ल – वाचा सविस्तर
पुणे : “शाळा सुरू करायला मान्यता नको, इरादा पुरेसा!” असा नवा शैक्षणिक मंत्र नन्हे परिसरातील आर्यन वर्ल्ड स्कूलने प्रत्यक्षात उतरवला आहे. शासनाची अंतिम मान्यता नसतानाही तब्बल ५६७ विद्यार्थ्यांना शिक्षण देत लाखो रुपयांची फी गोळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, अखेर संस्थेचे प्रमुख प्रणव मिलिंद लडगे यांच्यावर नन्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाकडून फक्त ‘इरादा पत्र’ मिळाले, पण शाळा मात्र निर्धास्तपणे सुरू! इरादा शिक्षणाचा की कमाईचा? असा सवाल आता पालक विचारत आहेत. पालकांना मान्यतेबाबत अंधारात ठेवून, पहिली ते सहावीपर्यंत वर्ग सुरू ठेवत दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून तब्बल ५८,६४० रुपये फी उकळण्यात आली. मान्यता नाही, पण फी मात्र ‘मान्य’! अशीच अवस्था.
महापालिकेच्या तपासात शाळा २०२१-२२ पासून सुरू असल्याचे, तर २६ जून २०२३ रोजी केवळ इरादा पत्र मिळाल्याचे समोर आले. एवढेच नाही, तर “शाळा बंद केली, विद्यार्थी दुसऱ्या शाखेत समायोजित” असे हमीपत्र देऊनही प्रत्यक्षात शाळा नन्हेतील इमारतीत ठणठणीत सुरू असल्याचे दोन वेळच्या पाहणीत स्पष्ट झाले. कागदावर बंद, वर्गात चालू! हा कारभार पाहून शिक्षण विभागालाही डोळे चोळावे लागले.
मान्यता नसतानाही फी आकारून पालक, विद्यार्थी आणि शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, शिक्षण हक्क कायद्यानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मालुसरे करत आहेत.
दरम्यान, “शाळा उघडायला नियम नकोत, फक्त इरादा पुरेसा” असा संदेश समाजाला देणाऱ्या अशा संस्थांवर कडक कारवाई कधी होणार? आणि पालकांच्या विश्वासावर उभारलेल्या या ‘अनधिकृत शिक्षण दुकानां’वर शासन कधी कुलूप ठोकणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.