येरवडा: महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘पिंक ई-रिक्षा योजना’ सुरू; जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडीत जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र; येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करावेत,

येरवडा, प्रतिनिधी : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांना आर्थिक व सामाजिक पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देणे आणि सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी शासनाने “पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” खरेदी योजना सुरू केली आहे.
या योजनेमुळे महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यास मदत होणार असून विधवा, कायदेशीर घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ युवती, अनुरक्षणगृह व बालगृहातील माजी प्रवेशित तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना लाभ देताना प्राधान्य दिले जाणार आहे.
योजनेअंतर्गत ई-रिक्षा खरेदीसाठी बँकेकडून ७० टक्के कर्ज मिळणार असून राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलणार आहे. फक्त १० टक्के हिस्सा लाभार्थी महिलांना स्वतःकडून उचलावा लागणार आहे. तसेच रिक्षा परवाना मिळविण्यासाठीही शासनाकडून आवश्यक ती मदत मिळणार आहे.
या योजनेचा लाभ २० ते ५० वयोगटातील, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील पात्र महिलांनी या योजनेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पंडीत जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र परिसर, गोल्फ क्लब रोड, डॉ. आंबेडकर चौकाजवळ, येरवडा, पुणे येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
—