पुणे: महापालिकेतील झाडणकाम घोटाळा उघड – महिला कामगार निलंबित, आरोग्य निरीक्षकावरही चौकशी

0
250px-Pune_Municipal_Corporation_building_in_October_2023.jpg

पुणे : पुणे महापालिकेत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार म्हणून नोकरी लावून देण्याच्या आमिषाने पैसे उकळणाऱ्या एका महिला बिगारीवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून तिच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित आरोग्य निरीक्षकाचाही चौकशीत समावेश करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नोकरीचं आमिष आणि फसवणूक
“टेंडर नामाने” दिलेल्या वृत्तानुसार,सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कामगाराने झाडणकामासाठी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने १८ गरजवंतांकडून एकूण लाखो रुपये उकळले. एका पीडित महिलेने जेव्हा याबाबत चौकशी केली, तेव्हा तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पवार यांच्याकडे करण्यात आली होती.

तक्रारीनंतर चौकशी आणि कारवाई
सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पवार यांनी केलेल्या चौकशीत आरोपी महिला बिगारीने तब्बल १८ जणांकडून पैसे घेतल्याचे उघड झाले. यानंतर परिमंडळ तीनचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी संबंधित महिलेवर निलंबनाची कारवाई केली. शिवाय, तिच्या सहकार्याने अपहार झाल्याच्या संशयातून आरोग्य निरीक्षकावरही विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रभारी मुकादमावर विनयभंगाचा आरोप पण चौकशीत निष्पाप
या प्रकरणात अधिक उलाढाल निर्माण करत आरोपी महिलेनं प्रभारी मुकादमावर विनयभंगाचा खोटा आरोप करून पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हे आरोप निराधार असल्याचे निष्पन्न झाले.

१४७ कोटींच्या टेंडरमध्येही संशयास्पद व्यवहार
महापालिकेने शहरातील झाडणकामासाठी १४७ कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. मात्र, त्यात ठरावीक ठेकेदारांना फायदा होईल, अशा अटी शर्ती ठेवण्यात आल्याचे समोर आले. अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या चौकशीतही या आरोपांना दुजोरा मिळाल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी हे टेंडर रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची हजेरी, पण रस्त्यावर कचरा कायम
महापालिकेकडून दरवर्षी सुमारे १४० कोटी रुपये झाडणकामासाठी खर्च करण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा, माती, दगड, पालापाचोळा पडून राहतो. कर्मचारी कामावर नसतानाही त्यांची हजेरी लावली जाते व नियमित पगारही घेतला जातो. यामागे क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य निरीक्षक, मुकादम, ठेकेदार यांचे संगनमत असल्याचा संशय आहे.

प्रत्येक विभागातील झाडणकाम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या

हडपसर-मुंढवा : ७०३

नगर रस्ता-वडगाव शेरी : ७४३

सिंहगड रस्ता : ४८६

कोंढवा-येवलेवाडी : ३१५

औंध-बाणेर : ४१९

वानवडी-रामटेकडी : ३०१

धनकवडी-सहकारनगर : ३९७

वारजे-कर्वेनगर : ३४६

येरवडा-कळस-धानोरी : ३१५

कोथरूड-बावधन : २८१

बिबवेवाडी : २२२

ढोले पाटील : २१६

शिवाजीनगर-घोले रस्ता : १२५

कसबा-विश्रामबागवाडा : ५६


शहर अस्वच्छ का? – प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह
कामगारांची हजेरी असूनही शहरातील अस्वच्छतेचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे या व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अपारदर्शकता आणि संगनमत यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed