पुणे रेशनिंग विभागात हफ्ता मागणीचा आरोप; नायब तहसीलदार अमोल हाडे अडचणीत; अजहर खान सामाजिक कार्यकर्त्याने केली मुख्यमंत्रीकडे तक्रार

पुणे | प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रेशनिंग विभागात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मार्केटयार्ड परिसरातील प्रेमनगरमध्ये शारदा महिला बचत गटाच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या रेशन दुकानाच्या दुकानदाराने नायब तहसीलदार आणि परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांच्यावर दरमहा १० हजार रुपयांच्या हफ्त्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सदर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याने दुकानाची तपासणी केल्यानंतर “सर्वजण हफ्ता देतात, तुम्हीही काळाबाजार करा व पैसे द्या” असा दबाव आणल्याचा खुलासा रेशनिंग दुकानदाराने व्हिडिओद्वारे केलेल्या मुलाखतीत केला आहे. त्याचवेळी नागरिकांनी हाडे यांना सवाल करण्यास सुरुवात केली असता तेथून त्यांनी पळ काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पूर्वीही तक्रारी, पण कारवाई शून्य
याआधी देखील अमोल हाडे यांच्याविरोधात अन्न धान्य वितरण कार्यालयात तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी झाल्याचे सांगण्यात येत असूनही वरिष्ठ पातळीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी आता जोर धरत आहे.
शिधापत्रिकांसाठी पैसे?
फक्त हफ्त्याची मागणीच नाही, तर शिधापत्रिका (रेशन कार्ड) मंजुरीसाठी देखील एका-दीड हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. ऑनलाइन प्रणाली लागू केल्यानंतर देखील परिमंडळ कार्यालयात हे प्रकार थांबलेले नाहीत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर काही लाभार्थ्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
या पार्श्वभूमीवर अजहर खान या सामाजिक कार्यकर्त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच विभागीय उपायुक्त (पुरवठा) यांच्याकडे तक्रार दाखल करत अमोल हाडे यांच्याकडून जबाबदारी तात्काळ काढून घेण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार?
सदर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– क्रमशः